भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) (1 जून 1953 – 21 ऑगस्ट 2024) संस्थापक – "होलार समाज मानवता मंदिर", बोपोडी प्रेरणास्थान व मुख्य सल्लागार – "होलार समाज सामाजिक संस्था" होलार समाजाचे भिष्म पितामह, आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाने मागे एक अपार सामाजिक कार्याचा वारसा सोडला आहे. मुळचे नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील असलेल्या गुरुजींनी 1976 मध्ये पुणे महानगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. पण त्यांची खरी ओळख समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची होती. 1980 मध्ये "होलार समाज मानवता मंदिर" या महाराष्ट्रातील पहिल्या समाज मंदिराची स्थापना करून त्यांनी समाजजागृतीचा विडा उचलला. 1980 ते 1997 या काळात अंगणवाडी व बालवाडी चालवून समाजातील लहानग्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवले आणि असंख्य समाज बांधवांना नवजीवन दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत 1985 साली पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" बहाल केला. गुरुजींनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, अनेक बांधवांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी होलार समाजाला एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजाला बंधुता, प्रेम, शिक्षण व समानतेचे मूल्य लाभले. त्यामुळेच संपूर्ण समाजाने त्यांना "भिष्म पितामह" आणि "समाजभूषण" अशा पदव्या बहाल केल्या. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर समाजासाठी अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तीचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने होलार समाजाने एक आधारस्तंभ गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे कार्य आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहील.